पेण (जि. रायगड) : हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी-तिपटीने गॅसचे भाव वाढवतील. केंद्र सरकारचे हे सगळे थोतांड आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुस-या टर्ममधला शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, गरीब या चार वर्गांचा उल्लेख करुन त्यावर सरकार काम करत असल्याचे सांगितले.
याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टिकाटिपण्णी केली. ते पेणमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी मोबाईलवर ऑनलाईन हायलाईट्स बघितल्या. त्यात सीतारामण म्हणाल्या, देशात चार जातींसाठी काम करणार. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. मी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं हे धाडस केलंय.
निवडणुका आल्यानंतर का होईना हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सुटाबुटातल्या मित्रांचा नसून तरुण, शेतकरी, गरीब आणि महिलांचा आहे. दहा वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात आलं आहे. आज तुम्हाला देशातल्या महिला दिसत आहेत, कारण निवडणुका आल्या आहेत.