22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमोदी ३.० मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

मोदी ३.० मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

 भाजप-घटक पक्षाला प्रत्येकी १८ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : मोदी ३.० मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला १८ तर घटक पक्षांना एकूण १८ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये घटक पक्षांना ७ कॅबिनेट आणि ११ राज्यमंत्रिपदे दिली जाणार आहेत. मोदींच्या तिस-या कार्यकाळाची मदार ज्या टीडीपी आणि जेडीयूवर अवलंबून आहे, त्यांना प्रत्येकी २-२ मंत्रिपदे दिली जाणार असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला प्रत्येकी एक, एलजेपी, जेडीएस, हम यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीतूनही तसे संकेत मिळाले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. यावेळी शहा यांनी घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. जेडीयूसोबत झालेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशिवाय संजय झा आणि ललन सिंह उपस्थित होते.

चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत दोन खासदार तर अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल होते. तर पवन कल्याण आणि चिराग पासवान एकटेच शहांना भेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीसाठी एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आणि जेडीयूसाठी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री यांच्या प्रस्तावावर सहमती झाली असून, रविवारी शपथविधीच्या दिवशी किंवा नंतर या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची हे ठरवले जाईल.

जेडीयू-टीडीपीकडून दबाव तंत्राचा वापर नाही

दरम्यान, घटक पक्षांकडून मंत्रिपदावरून दबाव आणण्यासारखा कोणताही प्रकार झाला नाही. यावेळी एनडीएला सरकार स्थापनेसोबतच पक्षाच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावे लागेल. जेडीयू-टीडीपीची नजर मंत्रिपदांव्यतिरिक्त राज्याशी संबंधित बाबींवर अधिक आहे. त्यामुळेच मंत्रिपदाच्या वाटाघाटीवर फारशी घासाघीस झालेली नाही. लोजप आणि जनकल्याण पक्षाचाही दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR