धुळे : विशेष प्रतिनिधी
राज्यात मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसा प्रचाराचा पारा वाढू लागला आहे. वार-पलटवारला जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी धुळे जिल्ह्यात महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यांनी यावेळी महाविकास आघाडीवर हल्ला चढवत महाराष्ट्र जिंकण्यासाठी ‘ट्रिपल एम’ मंत्र दिला.
मोदींचा पहिला एम – महिला राष्ट्रपती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी केलेल्या विरोधाची आठवण करुन दिली. या पक्षांनी द्रौपदी मुर्मू यांना हरवण्यासाठी संपूर्ण शक्ती लावली होती. आता ते रोज राष्ट्रपतींचा अपमान करत आहेत. बाबासाहेबांना हरवण्यासाठी नेहरुंसह सर्वांनी त्यांची शक्ती पणाला लावली होती. आजपासून ३०-३५ वर्षांपूर्वी बाबासाहेबांचा रोजचा अपमान करणे हे त्यांचं काम होतं. आज तेच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर केलं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
मोदींचा दुसरा एम – मराठी भाषा
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला केला. काँग्रेस आणि आघाडी सरकारमधील नेते महिलांना शिवीगाळ करत आहेत, हे महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आक्षेपार्ह भाषेचा वापर सुरु आहे. मातृभाषा आपली आई असते. आमच्या सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा मला अभिमान आहे. या निर्णयानं मला देश आणि जगभरातून मराठी भाषिकांची प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयामुळे ही सर्व मंडळी भावुक झाली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदींचा तिसरा एम – माझी लाडकी बहीण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सशक्तीकरणासाठी महायुती सरकारनं उचलेली पाऊलं काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला सहन होत नाहीत, असं सांगितलं. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात होत आहे. ही योजना थांबवण्यासाठी काँग्रेस वेगवेगळे कट करत आहे. काँग्रेस इकोसिस्टमची लोकं या योजनेच्या विरोधात कोर्टात गेली आहेत. काँग्रेस आणि त्यांच्या सहका-यांना सत्ता मिळाली तर ही योजना बंद होईल, असा आरोप त्यांनी केला.