नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रथम, घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. त्यानंतर मोदी सरकारने संसद आणि लोकशाहीवर हल्ला केला. ४७ खासदारांना निलंबित करून निरंकुश मोदी सरकारने लोकशाहीचे सर्व नियम कचऱ्यात टाकले आहेत.
ते म्हणाले की, आमच्या दोन सोप्या आणि साध्या मागण्या आहेत. संसदेच्या सुरक्षेतील अक्षम्य उल्लंघनाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्तव्य करावे आणि उत्तर द्यावे. याबाबतीत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान वृत्तपत्राला मुलाखत देऊ शकतात, गृहमंत्री टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देऊ शकतात. पण, ते संसदेला उत्तर देत नाहीत. संसद भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करते. आता संसदेत विरोधी खासदारांची संख्या कमी असल्यामुळे कोणत्याही वादविवादाशिवाय मोदी सरकार आता महत्त्वाची प्रलंबित कायदे मंजूर करू शकते, असे ते म्हणाले.