नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोदी यांचा चेहरा पुढे करून त्या निवडणुका जिंकल्या. लोकसभेची आगामी निवडणूकही भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. पण, मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला? याचा एक सर्व्हे करण्यात आला.
इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरव्ािंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव असे नेते एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नाही. राहुल गांधी हे भारत न्याय यात्रेत व्यस्त आहेत. अशावेळीच हा सर्व्हे करण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंतीचा चेहरा बनले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५९ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, सध्या पंतप्रधानपदासाठी सर्वात सक्षम चेहरा नरेंद्र मोदी हेच आहेत. या यादीमध्ये दुस-या उमेदवाराला २१ टक्के लोकांनी पसंती दिली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर लोकांनी राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य चेहरा मानले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे ही पंतप्रधानपदासाठी सक्षम व्यक्ती आहेत, असे सर्वेक्षणात सामील झालेल्या ९ टक्के लोकांचे मत आहे. देशातील २१ प्रमुख राज्यांमधील ५१८ लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्यात आले होते.
१२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतातील २१ प्रमुख राज्यांचा समावेश करण्यात आला. एकूण ९५ टक्के लोकसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागांसह भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती देण्यात आली आहे. तर, विरोधी भारत आघाडीला फक्त २ जागा मिळू शकतात, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षालाही एक जागा मिळू शकते, असेही या सर्व्हेमधून निदर्शनास आले आहे.