नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या आसाम दौ-यावरून निशाणा साधला आहे. खरे तर, पंतप्रधान मोदी ‘ऍडव्हान्टेज आसाम’ व्यवसायिकांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आसाममध्ये पोहोचले आहेत. खर्गे म्हणाले, मोदीजींनी आसाममध्ये घोषणांचा कारखाना लावला आहे. ज्याचे कर्ता-धर्ता भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. पुढच्या वर्षी जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करून याचे उत्तर देईल.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे, आसाममधील काँग्रेस नेत्यांवर नुकतेच राजकीय आणि शारीरिक, अशा दोन्ही प्रकारे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचे उत्तर जनता एक वर्षानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन करून देईल. आसाम राज्य हे, भाजपच्या भूमाफियांचा भ्रष्टाचार, द्वेश आणि कुशासनाचा परिणाम भोगत आहे.
खर्गे पुढे म्हणाले, तरुणांची बेरोजगारी, चहाच्या बागायतदारांची लाचारी, बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या मुद्यांवर सुप्रीम कोर्टाची फटकार आणि भाजपचा दुटप्पीपणा जगजाहीर आहे. राज्य विकासाच्या प्रत्येक पातळीवर आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडले आहे. आसाममधील ३.५ कोटी लोक अत्यंत संतप्त आहेत, मोदीजींची कोणतीही घोषणा आता त्यांचा राग शांत करू शकत नाही. आसाम आणि ईशान्येकडील राज्यामध्ये बदल निश्चित आहे.