नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी बिहारमधील रमन मैदानात एका रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे १५ जानेवारीपासून चंपारणमधून लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार मोहीमेला सुरुवात करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
बिहारमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वसमावेशक योजना आखल्या आहेत. राज्यातील सर्व ४० जागा ज्ािंकण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे.
अन्य पक्ष नेते करणार प्रचार
एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बिहारमध्ये अनेक रॅलींना संबोधित करू शकतात. सर्व प्रमुख रॅली १५ जानेवारीनंतर होण्याची अपेक्षा आहे, जेव्हा निवडणूक प्रचारावरील निर्बंध उठवले जातील.
२०१९ च्या निवडणुकीपेक्षा यावेळी बिहारमधील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राज्यात जेडीयूसह भाजपची सत्ता होती. यावेळी ते विरोधी पक्षात आहेत, तर जेडीयू महाआघाडी सरकारचा भाग आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएने बिहारमधील ३९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती.