नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांना आता पर्यटक वाहनाच्या आवाजाचा त्रास कमी होणार आहे. पर्यटकांनासुद्धा वाघाची डरकाळी स्पष्टपणे ऐकता येणार आहे. या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक वाहनांपैकी चार जुन्या वाहनांचे रुपांतर पेट्रोलवरुन बॅटरीवर करण्यात आले आहे.
ताडोबाच्या जंगलात व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांना जिप्सी, कँटर उपलब्ध असतात. मात्र, ही वाहने पेट्रोलवर चालणारी आहेत. ती जसजशी जुनी होत जातात, तसतसा त्यांचा आवाज वाढत जातो. त्यामुळे वाघांसह अतिशय संवेदनशील असणारे तृणभक्षी प्राणीदेखील विचलित होतात. या व्याघ्रप्रकल्पात प्रत्येक प्रवेशद्वारावर अंदाजे १६ पर्यटक वाहने तर मोहर्ली या प्रवेशद्वारावर अंदाजे ४० वाहने अशी एकूण सुमारे ३०० पर्यटक वाहने आहेत. त्यापैकी चार पर्यटक वाहनांचे पेट्रोलवरून बॅटरीवर चालणा-या वाहनात रुपांतर करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्याघ्रप्रकल्पातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने पर्यटनासाठी वापरण्यात यावीत असा प्रस्ताव होता. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या जेवढा फायद्याचा आहे, तेवढाच तो वन्यप्राणी आणि पर्यटकांसाठीदेखील फायद्याचा आहे. बॅटरीवर चालणा-या वाहनांचा आवाज अतिशय कमी असल्यामुळे वन्यप्राणी विचलित होणार नाहीत आणि पर्यटकांनाही आरामात या वन्यप्राण्यांचे नैसर्गिक वर्तन अनुभवता येईल.
याशिवाय पर्यटक मार्गदर्शक आवाजाच्या अडथळ्याशिवाय पर्यटकांशी संवाद साधू शकतात. वनखात्याने आधी पेट्रोलवर चालणारे वाहन बॅटरीवर रुपांतरीत करुन तब्बल तीन महिने चाचणी घेतली. त्यानंतर वाहनधारक या प्रयोगासाठी तयार झाले. पर्यटकदेखील आता बॅटरीवर चालणा-या वाहनांना प्राधान्य देत असल्याने भविष्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सर्व वाहने बॅटरीवर रुपांतरित झालेली दिसू शकतात.