मुंबई : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखीत झालेले आहे. काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे. नरेंद्र मोदी हे ११ वर्षांपासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. नरेंद्र मोदी यांनी द्वेष निर्माण करण्याचे काम केले आहे.
तीन तलाक, वक्फ बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या ११ वर्षात एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. गेल्या ११ वर्षांत एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही, या शब्दांत सपकाळ यांनी हल्लाबोल केला.
काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम
देशात शेतक-यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. पण पंतप्रधान मोदी मात्र स्वत:ची आरती करून घेत आहेत. कोरोना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली. आता अमेरिकेच्या टॅरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे. देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच पंतप्रधान मोदींनी देशाचे भले केले आहे का, सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे अशी टीका सपकाळ यांनी केली.