मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरूवारी राज्याच्या दौ-यावर येत असून ते दिवसभरात ३ सभा घेणार आहेत. मोदींची आजच्या दौ-यातील शेवटची शिवाजी पार्कच्या मैदानावर होत आहे. या वेळी महायुतीचे नेते आणि उमेदवार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शनची तयारी केली आहे. मोदींच्या सभेच्या माध्यमातून मुंबईत वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता १८ नोव्हेंबरला होणार असून प्रचारासाठी जेमतेम ५ दिवस उरले आहेत. यामुळे भाजपने आपल्या शिर्षस्थ नेत्यांच्या निवडणूक सभांचा सपाटा लावला आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी गुरूवारी दिवसभरत ३ सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होईल. त्यानंतर नवी मुंबईतील सेंट्रल पार्क खारघर येथे दुपारी ४ वाजता मोदींची दुसरी सभा पार पडेल. नवी मुंबईची सभा आटोपून मोदी संध्याकाळी ६ वाजता दादर, शिवाजी पार्क येथे आयोजित सभेला संबोधित करतील. तत्पूर्वी मोदी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन करतील.
शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच
शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या सभांसाठी तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे; परंतु अजून यापैकी कोणालाही मैदान मिळालेले नाही. शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रचार सभा घेण्याच्या परवानगीकरिता मुंबई महानगरपालिकेकडे तिघांचेही अर्ज आहेत. निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार असून आदल्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचार सभा या ऐतिहासिक मैदानावर घेण्यासाठी चढाओढ आहे शिवाय त्याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे रस्सीखेच सुरू आहे.
शिवाजी पार्क मैदानावर खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रम घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ४५ दिवसांची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा संपल्याची चर्चा असून कोणालाही १७ नोव्हेंबरला मैदान देता येणार नसल्याची चर्चा आहे मात्र महायुतीतील घटक पक्षांनी १०, १२ नोव्हेंबरसाठी मैदान आरक्षित केले होते; पण तेथे सभा झाली नाही. यामुळे १७ नोव्हेंबर रोजी मैदान उपलब्ध होऊ शकते, असे तिन्ही पक्षांचे मत आहे. महापालिकेने तिघांचेही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून नगर विकास विभागच त्यावर निर्णय घेणार आहे. परवानगीचा पहिला अर्ज आपण केल्याचा मनसेचा दावा आहे त्यामुळे आता नक्की कोणाला परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.