इंदूर : मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या नावाची प्रतीक्षा संपली आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि आठ दिवसांनंतर पक्षाच्या हायकमांडने त्यांचे नाव निश्चित केले आहे. मोहन यादव तिसऱ्यांदा उज्जैन दक्षिणमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यादव जुलै २०२० ते २०२३ पर्यंत शिक्षण मंत्री होते आणि २०१३ पासून ते आमदार आहेत. याशिवाय नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते.
दोन उपमुख्यमंत्री
सोमवारी झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात राजेश शुक्ला आणि जगदीश देवरा हे दोन उपमुख्यमंत्रीही असतील. केंद्रीय निरीक्षकांमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, पक्षाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण आणि सचिव आशा लाक्रा या बैठकीला उपस्थित होत्या.