24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरमोहिते पाटील भाजपविरोधात जाणार नाहीत

मोहिते पाटील भाजपविरोधात जाणार नाहीत

सोलापूर—माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी पुन्हा जाहीर झाली आहे. मात्र, निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले गिरीश महाजन यांनी भाष्य करत दोन ते तीन दिवस नाराजी चालेल. मात्र, विजयदादा आणि रणजितसिंह मोहिते पाटील भाजपविरोधात जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांची गुरुवारी (ता. १४ मार्च) दिवसभर शिवरत्न बंगल्यावर रिघ होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे समर्थकांनी तीव्र नाराजीची भावना बोलून दाखवली आहे. त्यामुळे आज शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत मोहिते पाटील यांची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले गिरीश महाजन यांना यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मोहिते पाटील हे भाजपविरोधात जाणार नाहीत, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, माढा लोकसभेचे तिकीट आता जाहीर झालेलं आहे. मोहिते पाटील यांची नाराजी २-३ दिवस चालेल. पण, मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो. माढ्यात कुठलीही अडचण येणार नाही.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपविरोधात जाणार नाहीत, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माढा लोकसभा मोहिते पाटील लढणार का आणि कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार, याची उत्सुकता असणार आहे.

दरम्यान, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीही चर्चा आमच्याकडे आता नाही. त्यांनी त्यांचं काम करावं. विशेष म्हणजे अद्याप त्यांचीही काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली नाही. सोलापूरसाठी या वेळेला राज्यात मंत्रिपद देण्याबाबत विचार होईल, असेही विधान महाजन यांनी केले.

महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे दोन खासदार निवडून येण्याची शक्यता नाही आणि ते नितीन गडकरी यांना उमेदवारी देऊ म्हणतायत. सोलापूरसाठी यावेळेला राज्यात मंत्री पद देण्याबाबत विचार होईल. तसेच, एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्याशी माझं बोलणं झालं. ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. हा प्रश्न आज उद्या निकाली निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून लोकांनी मदत केलेली आहे. काँग्रेसच भविष्य अंधारात आहे, त्यामुळे त्यांना लोक डोनेशन देत नसतील, असा युक्तिवाद भाजप नेते गिरीश महाजन यांनी इलेक्टोरल बॉण्डबाबत दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR