नवी दिल्ली : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात ८ डिसेंबर रोजी टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी खासदारकी गमावली. याविरोधात महुआ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज १५ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्ही भाटी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. महुआंच्या वतीने वकील अभिषेक मनू सिंघवी न्यायालयात हजर राहिले. आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय ३ जानेवारीला सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायमूर्ती कौल यांच्याकडे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती कौल म्हणाले होते. या याचिकेवर सीजेआय चंद्रचूड निर्णय घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीजेआय चंद्रचूड यांनी १३ डिसेंबर (बुधवार) रोजी हे प्रकरण लवकरच लिस्ट करण्याचा विचार करण्याचे सांगितले होते. यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शुक्रवार तारीख निश्चित करण्यात आली होती.
लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांना लवकरच सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. संसदेच्या गृहनिर्माण समितीने मंगळवारी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाला पत्र लिहून माजी खासदार महुआ यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.