25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरधाराशीवमार्गे पैसा दिल्लीला; सोडण्यात आलेल्या २ शिक्षकांसह ४ जणांना अटक

धाराशीवमार्गे पैसा दिल्लीला; सोडण्यात आलेल्या २ शिक्षकांसह ४ जणांना अटक

नीट’च्या पेपरची ४० ते ५० लाखांत विक्री नांदेड एटीएसची कारवाई

नांदेड/लातूर : एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या नीटचे पेपर तब्बल ४० ते ५० लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. यात लातूरसह, नांदेड तसेच दिल्लीतील लोकांचे रॅकेट काम करत होते, हे तपासात पुढे आले असून याप्रकरणी लातूरचे २ शिक्षक आणि नांदेडच्या एकासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धाराशीवमार्गे संपूर्ण पैसा हा दिल्ली येथे जात असल्याचा खुलासा पोलिस चौकशीतून झाल्याने खळबळ उडाली आहे. नांदेड एटीएसच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

यात एक शिक्षक फरार झाला असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही शिक्षक लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसचे चालकही आहेत. या पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक तसेच मुळ देगलूर (जि. नांदेड) आणि दिल्लीतील एक अशा चौघांविरूद्ध लातूरच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक शिक्षक हा लातूर तर दूसरा हा सोलापूर येथे काम करतो. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे.

संजय जाधव मूळ बोथी तांडा (ता. चाकूर) येथील असून सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड येथील रहिवाशी जलील उमरखाँ पठाण लातूर येथील कातपूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. हे दोघेही लातूर येथे खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते. नांदेड, लातूर येथे नीट व जेईईची तयारी करणा-या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी कोचिंग क्लासेसची संख्या या ठिकाणी वाढतच आहे. याच दृष्टीने एटीएसचे पथकाने तपास सुरू केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

लातूर, नांदेडमध्ये रॅकेट
पेपरफुटीच्या प्रकरणात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांच्या फिर्यादीवरुन संजय तुकाराम जाधव (वय ४०, रा. लातूर), जलीलखॉ उमरखान पठाण (वय ३४, रा. लातूर), ईरन्ना मष्णाजी कोनगलवार (मुळ रा. देगलूर जि. नांदेड ह.मु. आयटीआय उमरगा जि. धाराशिव) आणि गंगाधार (रा. दिल्ली) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल
संजय तुकाराम जाधव, जलिलखॉ उमरखान पठाण हे दोघे पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आवेझ काझी यांना कळली. त्यावरुन एटीएसचे पोलिस निरीक्षक सुनील नाईक हे तपासासाठी त्यांच्या पथकासह लातुरात दाखल झाले. त्यांनी लातुरातील दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक चौकशी केली. या दोन्ही शिक्षकांच्या मोबाईलवरील माहिती, फोन गॅलरीमधील परिक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र, व्हॉटसअप चॅटिंगबाबत आदी अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. त्यामध्ये जलिलखॉ पठाण याने संजय जाधव यास प्रवेश पत्राच्या प्रति आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात मेसेजेस् पाठविल्याचे आढळून आले.

तसेच जाधव याने अन्य एक संशयीत नांदेड जिल्ह्यातील देगलूरचा ईरन्ना मष्णाजी कोनगलवार यास विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे व्हॉटस्अपद्वारे पाठविले. पुढे ईरन्ना कोनगलवार याने दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीला संपर्क केला. जो पैशाच्या मोबदल्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार करीत असल्याचा संशय असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले असून तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR