मुंबई : प्रतिनिधी
शासकीय यंत्रणेने योग्य नियंत्रण ठेवल्यास आपोआप हॉस्पिटल्सना चांगले काम करावे लागेल. यासाठी मोबाईल अॅपची निर्मिती करत आहोत. यामुळे पेशंट किंवा नातेवाईकांकडून ऑनलाईन आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला येईल. हॉस्पिटलची तक्रारदेखील ऑनलाइन पद्धतीने नातेवाईकाला देता येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
गेल्या ५ वर्षांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात १ हजार ७ तक्रारी आल्या होत्या, असे आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले. हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता मोबाईल अॅपद्वारे लोकांना मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबतच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल आम्ही केले आहेत. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली, या संदर्भात बोलताना आबिटकर यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती, ती झालेली नाही. यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली, आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत, त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातदेखील सर्वच निवडणुका एकत्रित लढवणे अपेक्षित आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील आम्ही एकमेकांच्या समन्वयाने लढलो तर राज्याचे चित्र दिसले ते जिल्ह्यात देखील दिसेल, असे ते म्हणाले.
जनआरोग्य योजनेअंतर्गत पैसे घेतल्यास कारवाई
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत एकही रुपया पेशंटकडून घ्यायचा नसताना दुर्दैवाने काही हॉस्पिटल पेशंटकडून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ४ हॉस्पिटलवर अशी कारवाई झाली असून राज्यातदेखील ही कारवाई सुरू होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.