भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मान्सून हंगाम २०२४ चा आपला पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला. त्यानुसार मान्सूनआधी अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. गतवर्षी पावसाने ओढ दिल्यानंतर देशाच्या विविध भागात सध्या दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुशखबर दिली आहे. यंदा मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान धो-धो बरसेल असा अंदाज आहे. यंदा मान्सून १०४ ते ११० टक्के बरसणार असून हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरेल. २०२४ मध्ये १०६ टक्के म्हणजे ८७ सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो. याआधी ९ मार्च रोजी खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. जून ते सप्टेंबर दरम्यान ९६ ते १०४ टक्के पाऊस होऊ शकेल असा त्यांचा अंदाज आहे.
यंदा २० राज्यांत सामान्य ते जास्त पाऊस होऊ शकतो. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आदी राज्यांत चांगला पाऊस होईल तर छत्तीसगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सामान्य पाऊस होईल. ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे. यंदा जून-जुलैमध्ये कमी पाऊस पडेल तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभागाकडून मान्सूनबाबत अखेरचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. हवामान बदलामुळे जोरदार पाऊस होण्याचे दिवस कमी होत आहेत तर कमी वेळात अधिक पाऊस होण्याचे दिवस वाढत आहेत. त्यामुळे दुष्काळ व पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात वर्षभर होणा-या पावसापैकी ७० टक्के पाऊस हा मान्सूनच्या काळातच पडतो. देशातील ७० ते ८० टक्के शेतकरी शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत. मान्सून कमी झाल्यास शेती उत्पादन घटते, त्यामुळे महागाईत वाढ होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषि क्षेत्राचा हिस्सा २० टक्के आहे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यातून रोजगार मिळतो. चांगला पाऊस पडल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस तर ९० ते ९५ टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी, ९६ ते १०४ टक्के पाऊस म्हणजे सरासरीइतका पाऊस तर १०५ ते ११० टक्के पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा अधिक आणि ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस सर्वाधिक पाऊस समजला जातो. हवामानाच्या प्रभावामुळे जून-जुलैमध्ये मान्सूनचा वेग मंद असेल परंतु त्याची भरपाई दुस-या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) होईल. आयएमडीच्या माहितीनुसार २०२३ मध्ये ८२० मिमी पाऊस झाला होता. साधारणपणे ८६८.६ मिमी पाऊस पडतो. याआधी सलग चार वर्षे सामान्य ते जास्त पाऊस पडत होता. अल निनो आणि ला निनामुळे निर्माण होणा-या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागाने दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आहेत. अल निनो जाऊन ला निना येत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे महापात्रा यांनी म्हटले आहे. हवामान विभागाकडे असलेल्या सुमारे ७० वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तरपणे अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्वेतील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा ५ टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो. असे असले तरी सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण जास्तच राहील. यंदा महाराष्ट्रातही चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सुपर अल निनोची स्थिती निर्माण झाली होती. त्याचा फटका बसल्यामुळे मान्सून तर कमी झालाच पण परतीचा पाऊसही हवा तसा नव्हता. गतवर्षी नोव्हेंबर ते मार्च दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट झाली. यंदा तसे न होता एप्रिलमध्ये गारपीट झाली आणि येत्या काही दिवसांतही ती होऊ शकते. हे अल निनो आणि ला निनाच्या बदलत्या स्थितीचे संकेत आहेत. एकूण स्थितीचा विचार करता यंदा महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाबरोबरच मान्सूनपूर्व आणि परतीचा पाऊसही चांगला होऊ शकतो. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढते तेव्हा त्या स्थितीला अल निनो असे संबोधले जाते. वारे वेगाने वाहू लागल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वेगाने कमी होऊ लागते तेव्हा त्या स्थितीला ला निना असे म्हटले जाते. या दोन्ही स्थितीचा जगभरातील तापमानावर परिणाम होत असतो. एप्रिल महिना अर्ध्यावर असताना तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्णतेच्या अस झळा सहन कराव्या लागत आहेत. राज्यावर पाणीटंचाईचे बिकट संकट ओढवले आहे.
ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. गतवर्षी अपुरा पाऊस झाल्याने सध्या मराठवाडा ‘टँकरवाडा’ बनला आहे. हजारो वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांनाही पाणी समस्येने ग्रासले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल सुरू असल्याने प्रशासन आणि सरकारला पाणी समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नाही. निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांचे जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध होत आहेत त्यात पाणी प्रश्नाचा उल्लेखही नाही. राज्यात सुमारे १८०० हून अधिक गावे आणि ४३००हून अधिक वाड्यांवर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. जनावरेही पाण्याविना तडफडत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात जनावरांचा चारा आणि पाण्याचे गंभीर संकट उभे आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत या संकटाचा सामना कसा करायचा? हवामान विभागाने यंदा उत्तम पावसाचा अंदाज वर्तविल्याने जनतेला दिलासा मिळाला असला तरी केवळ त्या आशेवर समस्याग्रस्त दिवस ढकलता येतील काय?