पुणे : मार्च-एप्रिलमधील उष्णतामान अस करून सोडत असताना यंदा पाऊसमान कसे राहील याची चर्चा सुरू झाली आहे. जागतिक हवामान केंद्रांनी भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविला असला, तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमानाचे भाकीत केले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची बचत हे मोठे आव्हानात्मक काम प्रशासनासह नागरिकांसमोर असणार आहे.
दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. भारतीय हवामान खात्याकडून दरवर्षी दोन ते तीन टप्प्यांत पावसाचे अंदाज वर्तवले जातात. काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तविण्यास सुरुवात केलेली आहे. हवामान खात्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक हे पंचांगासह अन्य काही पारंपरिक भविष्यवाणीवरही अवलंबून राहत आले आहे. भेंडवळच्या घटमांडणीतून येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे भाकीत वर्तविले जाईल. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान राहण्याचे भाकीत केले आहे.
मान्सून केरळमध्ये कधीपर्यंत येणार?
दाते पंचांगात याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. पंचांगकर्त्यांच्या भाकितानुसार, यंदा केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे ४ जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात १६ जूनपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेषत: जुलै, ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊसमान होण्याचा अंदाज दिला असला तरी मागच्या वर्षीपेक्षा यंदा कमी पर्जन्यमान राहण्याचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यांत वाढत्या उष्णतामानच्या काळात पाण्याची बचत करण्याचे तगडे आव्हान जिल्हा प्रशासनासह नागरिकांसमोर असणार आहे.
५ नक्षत्रांत होणार चांगला पाऊस
पंचांगकर्त्यांनी आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा व हस्त या पाच नक्षत्रांमध्ये पाऊस ब-यापैकी होण्याचे भाकीत केले आहे. १६ जून ते १५ जुलै तसेच २ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर २० सप्टेंबर ते ७ऑक्टोबर या काळात पावसाचे योग सांगितले आहेत. काही प्रदेशात दुष्काळसदृश परिस्थिती राहण्याचाही अंदाज दिला आहे. ८ जूनच्या बुध-गुरू युतीमुळे मेघगर्जनेसह पाऊस होईल; परंतु मृग नक्षत्राचा पाऊस हुलकावण्या देईल असे दाते पंचांगात म्हटले आहे.