नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पहिल्या १०० दिवसांत यात्रेकरूंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला १ हजाराहून अधिक गाड्या चालवण्याची योजना जाहीर केली आहे. या गाड्यांचे संचालन भव्य उद्घाटन समारंभाच्या काही दिवस आधी १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामुळे यात्रेकरूंना अयोध्येत पोहोचण्यास मदत होईल. २३ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिरात भगवान श्री रामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार आहे, त्यानंतर मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुले केले जाईल.
मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे. अयोध्या स्थानकाचे नूतनीकरण केले गेले आहे जेणेकरून प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही. दररोज ५०,००० लोकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या या नवीन स्टेशनचे बांधकाम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, काही गाड्या यात्रेकरूंच्या गटांसाठी चार्टर्ड सेवा म्हणून आरक्षित केल्या आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) या कालावधीत अयोध्येला भेट देणाऱ्या मोठ्या संख्येने भाविकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चोवीस तास केटरिंग सेवा प्रदान करण्याची तयारी करत आहे.
मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. प्रभू रामाच्या जन्मस्थानाला भेट देण्याव्यतिरिक्त, यात्रेकरूंना आता पवित्र सरयू नदीवरील इलेक्ट्रिक कॅटामरन (नौका) वर राइडचा आनंद घेण्याची देखील संधी मिळेल. १०० लोकांना सामावून घेण्याची क्षमता असलेली कॅटामरन (नौका) अयोध्येत अध्यात्मिक अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त आकर्षण म्हणून काम करेल.
‘ही’ शहरे जोडली जाणार
या कालावधीत, भाविकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी, अयोध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह विविध क्षेत्र आणि शहरांशी अयोध्या जोडली जाणार आहे.