बँकॉक : अन्न असुरक्षितता ही आशियातील जुनी समस्या असून कोरोना महामारीच्या तुलनेत २०२२ मध्ये ५.५ कोटींपेक्षा अधिक लोकांना दोन वेळचे अन्न न मिळाल्याने ते कुपोषित राहिले, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. कोरोनानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मंदी, नैसर्गिक आपत्ती, युद्धामुळे अन्नपुरवठ्यात आलेली बाधा, हवामान बदल यामुळे लाखो नागरिकांची रोजीरोटी गेल्याने कुपोषित राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
येथील लोकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून अन्न मिळविण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल अनिश्चितता असते आणि पैशाच्या कमतरतेमुळे सतत रिकामे पोट ठेवावे लागले. सतत उपाशी राहिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. जगासाठी हा धोका ३० टक्के तर आशिया आणि पॅसिफिकसाठी २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक वर्षांपासून अन्नसुरक्षेबाबतचिंता व्यक्त करत उपाययोजनांबाबत चर्चा केली जात असताना अद्यापही ही समस्या कायम असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून दिसून आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी अन्न मिळते. २०२१ मध्ये कुपोषित व्यक्तींचे प्रमाण ८.८ टक्के होते, ते २०२२ मध्ये घटून ८.४ टक्के झाले असले तरी, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा या लोकांच्या पालनपोषणासाठी खर्च होतो.
महिलांवर मोठे संकट
कुपोषण महिलांसाठी सर्वांत वाईट समस्या आहे. आशियातील पाचपैकी एका महिलेला तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. द. आशियामध्ये ४२% महिलांना, तर ३७% पुरुषांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे.
युद्धाने घास हिरावला
कोरोनानंतर अन्न, इंधन, खते आणि पशुधनाच्या खाद्याच्या किमती वाढल्याने अन्न सुरक्षा मोहिमेवर परिणाम झाला. युद्धामुळे धान्य, खाद्यतेल पुरवठ्यात व्यत्यय आल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत.
भूकेच्या समस्येमागील कारणे
– लोकांमध्ये अन्न खरेदी करण्याची क्षमता नसणे
– पैसे कमी असल्याने कमी दर्जाचे अन्न खाणे
– महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी अन्न मिळणे
– इंधन, अन्न, खतांच्या किमती वाढल्याने अडथळे
– अन्नपुरवठ्याचे असमान वितरण
अन्नसुरक्षेची समस्या
– २.४ अब्ज : लोकांना अपुरे अन्न उपलब्ध
– ४२ टक्के : महिलांसमोर अन्नसुरक्षेचे संकट
– ३७ टक्के : पुरुषांसमोर संकट
– ३/४ : जणांना पोषक अन्न परवडत नाही (आफ्रिका)
कुपोषणाचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)
– ९.२ : जगाची सरासरी
– १६ : दक्षिण आशिया