17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ६ लाखांहून जास्त दिव्यांग मतदार

राज्यात ६ लाखांहून जास्त दिव्यांग मतदार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोग ही मतदानाची पूर्वतयारी करत आहे. राज्यात या विधानसभेसाठी ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ कोटी मतदार आहेत. त्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येबद्दल माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. राज्यात एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये ३ लाख ८४ हजार ६९ हे पुरुष मतदार आहेत तर २ लाख ५७ हजार ३१७ महिला दिव्यांग मतदार आहेत यासोबतच ३९ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार
दिव्यांग मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे येथे ८८ हजार ९३७ दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ४८ हजार ६२६ पुरुष, ४० हजार ३०१ महिला आणि १० तृतीयपंथी दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

सर्वांत कमी नोंदणी गडचिरोलीत
पुणे पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ३८ हजार १४९ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये २१ हजार ५७३ पुरुष मतदार, १६ हजार ५७३ महिला मतदार आणि ३ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची सर्वांत कमी नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे ६ हजार ४३ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यामध्ये ३ हजार ७१० पुरुष आणि २ हजार ३३३ महिला दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

तृतीयपंथी दिव्यांग मतदार
राज्यातील तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ३९ आहे. यापैकी सर्वाधिक तृतीयपंथी दिव्यांग मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. औरंगाबादमध्ये एकूण १२ तृतीयपंथी दिव्यांग मतदार आहेत. पुणे जिल्ह्यात १०, नांदेड जिल्ह्यात ६, ठाणे जिल्ह्यात ३, पालघर आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी २ तृतीयपंथी दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. याशिवाय लातूर, सोलापूर, मुंबई उपनगर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ तृतीयपंथी दिव्यांग मतदार नोंदणीकृत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR