सोलापूर – श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे त प्रत्येक मंदिरांसाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. याचबरोबर मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग कायदा शासनाने तात्काळ लागू करावा यांसह एकूण १० ठराव हर हर महादेव च्या गजरात एकमताने संमत करण्यात आले. मंदिर महासंघाच्या या मागण्या घेऊन लवकरच मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असून त्यासाठी राज्याचे रोजगारहमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विशेष सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे.
या परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून सर्वश्री दिलीप पाटील, मल्लिकार्जुन देवस्थान शेळगी, गोवर्धन मायकल, श्रीचौडेश्वरी देवस्थान, दीपक परदेशी, श्रीवैष्णव मारुती देवस्थान, भास्कर राऊळ, श्री वैष्णव मारुती देवस्थान जुने घरकुल, दुभाषी नारायण श्री वैष्णव मारुती देवस्थान जुने घरकुल, शैलेंद्र जोशी, जुने विठ्ठल मंदिर यांच्यासह ६९ हून अधिक मंदिर विश्वस्त प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढील काळात देशासाठी आदर्श असे मंदिरांचे संघटन महाराष्ट्रात उभे करण्याचे निश्चय सर्वांनी केला.
मंदिर परिषदेत मंदिरांच्या विविध समस्यांवर चर्चा, तज्ञ अन् मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच गटचर्चा आयोजित करण्यात आल्या. यात मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे , वक्फ कायद्या द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय , मंदिरांमधील वस्रसंहिता , धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरांचा समन्वय आदी विषय होते. त्यातून वरील ठराव संमत करण्यात आले.