नवी दिल्ली : भारतात येणा-या भूकंपाबाबत माहिती समोर आली असून गेल्या चार वर्षांत देशभरात ३०० हून अधिक भूकंप झाले आहेत. सन २०२० ते नोव्हेंबर सन २०२३ पर्यंत एकूण ३१० भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. केंद्र सरकारने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या वर्षी, म्हणजे २०२३ मध्ये या भूकंपात लक्षणीय वाढ झाली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार २०२३ मध्ये १२४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. ९७ भूकंपांची तीव्रता ३.० ते ३.९ दरम्यान होती, तर ४.० ते ४.९ तीव्रतेचे २१ भूकंप आले. तसेच, चार वेळा भूकंपाची तीव्रता ५.० ते ५.९ दरम्यान आणि दोनवेळा ६.० ते ६.९ तीव्रतेचे भूकंप आले. म्हणजे गेल्या चार वर्षांत सर्वाधिक भूकंप या वर्षी झाले. २०२३ मध्ये भूकंपाच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्ट सक्रिय होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे २४ जानेवारी २०२३ रोजी ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
३ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर २०२३ रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ३ ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.२ होती, तर नोव्हेंबरला झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी होती. दोन प्रचंड मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर वसलेले असल्यामुळे उत्तर भारतापासून ईशान्य भारतापर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या प्रदेशात वारंवार भूकंप होतात. या प्लेट्सच्या टक्करमुळे भारत आणि नेपाळ, या दोन्ही देशांमध्ये सातत्याने भूकंप होतात. नेपाळ आणि हिमालयीन प्रदेशात जेव्हा जेव्हा भूकंप होतो तेव्हा दिल्ली आणि उत्तर भारताला तो जाणवतो.
सौम्य आणि तीव्रता कशी ओळखणार?
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. रिश्टर स्केलवर भूकंप तीव्र आहे की सौम्य हे ओळखता येतो, यावरुन किती नुकसान झालं असेल याचा देखील सहज अंदाज येतो. एक युनिटने जेव्हा रिश्टर स्केल वाढतो, तेव्हा त्याची ऊर्जा दहापटीने वाढते. रिश्टर स्केल, रिश्टर मापन ही नेमकी भूकंपाची धक्क्याचे प्रमाण आणि त्याची बाहेर पडण्याची ऊर्जा मोजण्याचे काम करते. रिश्टर स्केलवरच भूकंपाची तीव्रता ठरते, म्हणून केव्हाही भूकंपाची माहिती आल्यावर तो किती रिश्टर स्केलचा आहे, याची माहिती सर्वात आधी दिली जाते. देशाने अनेक जास्त तीव्रतेचे भूकंप पाहिले आहेत, त्यात महाराष्ट्रात १९९३ साली किल्लारीचा, तर गुजरातने २००१ साली भूजचा.
स्केल आणि धोके
– रिश्टर स्केल १.० ते २.९ – तीव्रता सौम्य लोकांना सहसा जाणवत नाही.
– दरवर्षी १ लाख धक्के
– रिश्टर स्केल ३.० ते ३.९ तीव्रता सौम्य धक्के काहींना जाणवतात, नुकसान नाही – दरवर्षी १२ हजार ते १ लाख
– रिश्टर स्केल ४.० ते ४.९ तीव्रता कमी, धक्के सर्वांना जाणवतात, कमकुवत जुन्या इमारतींना धोका, दरवर्षी २०० ते २ हजार
– रिश्टर स्केल ५.० ते ५.९, मध्यम, कमकुवत जमीन, घरांना धोका, २०० -२,000 दरवर्षी
– रिश्टर स्केल ६.० , ६.९ शक्तीशाली, लोकसंख्या जास्त असलेल्या भागात नुकसान, २० – २०० दरवर्षी
– रिश्टर स्केल ७.०, ७.९ विनाशकारी, दूरपर्यंत जीवघेणा , ३ – २० दरवर्षी
– रिश्टर स्केल ८.० आणि त्यापेक्षा जास्त, हाहाकार उडवणारा, मोठ्या क्षेत्रफळात जिवित हानी.