34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअजित मुख्यमंत्री व्हावा...!; आईची इच्छा

अजित मुख्यमंत्री व्हावा…!; आईची इच्छा

बारामती : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पहिल्यांदाच या निवडणुकीच्या माध्यमातून आमने-सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनीही मतदानात भाग घेतला आहे. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना त्यांच्या आई म्हणाल्या, मी वयाच्या २७ व्या वर्षापासून मतदान करत आहे. माझं आता वय झालंय. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे.

माझ्या डोळ्यादेखत अजितदादांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. सर्व बारामती आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली आहे. अजितदादा यांच्या आईंनी ही इच्छा व्यक्त करताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपला मुलगा उच्च पदावर जावा ही कोणत्याही आईची इच्छा असते. त्यात काही गैर नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजितदादांची आई आशा पवार यांच्या इच्छेविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थातच. कुठल्या आईला तसं वाटणार नाही?, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांच्या स्वप्नांसाठी आईची प्रार्थना असेल तर स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया अजितदादांच्या स्वप्नाला भरारी देणा-या ठरोत. अजितदादांचे मत आणि मन परिवर्तन होणार असेल तर मात्र नक्कीच आईचे स्वप्न पूर्ण होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

त्यात गैर नाही : मुनगंटीवार
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इच्छा असणं गैर कधीच नसतं. फक्त कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीने काम करावं. एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होणं किंवा इच्छा व्यक्त करण्यात गैर असू शकत नाही. मुख्यमंत्री झाल्यावर ख-या मुख्यमंत्र्यांचा अर्थ कळतो. मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक क्षण आणि कृती ही कॉमन मॅनसाठी असायला हवी, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

प्रत्येक आईला वाटते : आदिती तटकरे
राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनीही अजितदादांच्या आईच्या इच्छेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही आईला वाटतं आपल्या मुलाने राज्याचे नेतृत्व करावे. त्यांनी इच्छा व्यक्त केली. दादांचा दांडगा अनुभव आहे. अजितदादा अनेक वर्षांपासून काम करत आहेत. सर्वांनी त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. आईने प्रामाणिकपणे इच्छा बोलून दाखवली आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR