मुंबई : मुंबईत झालेल्या वेव्ह समीट २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ८००० कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला.
तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह,आदी उपस्थित होते. सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत.
नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.
२ सर्वोत्तम विद्यापीठांसोबत करार : फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे.