मुंबई : मराठा आरक्षणावरून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमधील संघर्ष आता अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले असता सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे हे उपचार सोडून अंतरवालीला निघाल्याची माहिती आहे.
मंडपाला हात लावाल तर याद राखा
जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही असे आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची पोलीस अधिका-यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही असे आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिल्याची माहिती आहे. मंडपाच्या एकाही कापडाला हात लावला, त्यावरील शिवरायांच्या मूर्तीला हात लावाल तर महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.