22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रखासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरे गटात

खासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरे गटात

मुंबई : प्रतिनिधी
जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. उन्मेष पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी मशाल हाती घेतली.

यावेळी पाटील यांच्या शेकडो समर्थकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ‘मातोश्री’ परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांचे तिकिट कापले. उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकिट देण्यात आले. त्यामुळे उन्मेष पाटील प्रचंड नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली अन् आज अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात ठाकरे गट अधिक मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावातून लढणार
दरम्यान, उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगावातून लढणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची घोषणाही केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्मेष पाटील हे जळगावातून विजयी झाल्यास शिवसेनेचा जळगावमधील हा पहिला विजय असेल. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ठाकरे गट भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR