चेन्नई : आयपीएलच्या १८ व्या मोसमातील तिस-या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १५५ धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज निष्प्रभ ठरले. ओपनर रोहित शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाजांना सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्या खेळीचं रुपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या दोघांनाही अपेक्षेनुसार काही करता आलं नाही. तसेच अखेरच्या क्षणी दीपक चाहर याने २८ धावांची निर्णायक खेळी केली. दीपकच्या या खेळीमुळे मुंबईला १५० पार पोहचता आलं. आता मुंबईचे गोलंदाज १५५ धावांचा बचाव करण्यात यशस्वी होणार की चेन्नई विजयी सलामी देणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुंबईसाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. तिलकने २५ बॉलमध्ये ३१ रन्स केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव याने २६ चेंडूंत २९ धावांचं योगदान दिलं. रायन रिकेल्टन याने १३, विल जॅक्स ११, नमन धीर १७ आणि मिचेल सँटनर याने १७ धावा जोडल्या. रॉबिन मिंझ याने ३ रन्स केल्या. तर ट्रेन्ट बोल्ट १ धाव करुन माघारी परतला. तर अखेरच्या क्षणी दीपक चाहर याने स्फोटक बॅटिंग करत मुंबईची लाज राखली आणि पलटणला १५० पार पोहचवलं. दीपकने १५ बॉलमध्ये २ सिक्स आणि २ फोरसह नॉट आऊट २८ रन्स केल्या. तर एस राजुने नाबाद १ धाव केली.
चेन्नईकडून एकूण ६ जणांनी बॉलिंग केली.नूर अहमद याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. नूरने ४ ओव्हरमध्ये १८ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतल्या. खलील अहमद याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नॅथन एलिस आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. तर सॅम करन आणि रवींद्र जडेजा हे दोघे विकेट घेण्यात अपयशी ठरले.