24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर २० ते २८ जानेवारीदरम्यान मुंबई फेस्टिव्हल

दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर २० ते २८ जानेवारीदरम्यान मुंबई फेस्टिव्हल

मुंबई (प्रतिनिधी) : दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर २० ते २८ जानेवारीदरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या ९ दिवसांच्या महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फुड फेस्टिव्हल सादर केले जाणार असून या फेस्टिव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.

राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई फेस्टिव्हलची घोषणा केली. या वेळी मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक बिंद्रा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.

या मुंबई फेस्टिव्हलची अधिक माहिती देताना महाजन म्हणाले, हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्व समावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे. जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट­व्हिलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महा मुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतीचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील आयकॉन्स एकत्र येतील. मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप अ‍ॅण्ड विन फेस्टिव्हल. ज्या मध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आऊटलेट्स तसेच मनोरंजनाचा समावेश असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR