नवी दिल्ली : आयपीएलच्या १८ सीजनमधील रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव केल्याने मुंबईने दिल्लीची विजयी घोडदौड रोखली. या सीजनमधील दिल्लीचा पहिला पराभव असून यापूर्वी दिल्लीने सलग ४ सामने जिंकले आहेत. तर मुंबईने ४ पराभवानंतर दुस-यांदा विजय मिळविल्याने गुणतालिकेत ७ वे स्थान पटकावले आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमवून २०५ धावा केल्या आणि विजयासाठी २०६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गाठताना पहिल्याच चेंडूवर दिल्लीची पहिली विकेट पडली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स बॅकफूटवर गेली होती. पण तसे काही झाले नाही. दिल्लीने करूण नायरच्या रुपाने इम्पॅक्ट कार्ड काढले. करूण नायरचा फॉर्म काय आहे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांनी अनुभवले होते. त्याची प्रचिती या सामन्यातही आली. करुण नायरने जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडला.
जसप्रीत बुमराहची देखील खैर केली नाही. त्याने फक्त २२ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतरही त्याचा खेळ सुरुच होता. नायरच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची स्थिती करूण झाली होती. करुण नायरने ४० चेंडूत ८९ धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. त्यामुळे सोपा वाटणारा विजय पराभवात रुपांतरीत झाला.