35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्र२०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर करणार

२०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर करणार

अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलरपर्यंत नेण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत केली.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० बिलियन डॉलरवरून २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलर तर २०४७ पर्यंत १.५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले. तसेच नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे यासाठी नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली तर स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्धार अजित पवारांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गत­मिान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे असेही अजित पवारांनी सांगितले.

महाराष्ट्र सागरी दळणवळणातील ‘महाशक्ती’
जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर­त आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग २६ टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे ३०० दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे.

जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे. २०३० पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणा-­या जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे असे अजित पवारांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR