21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुंडे बहीण-भावाचे फोटो फुलचंद मुंडेच्या प्रचारात

मुंडे बहीण-भावाचे फोटो फुलचंद मुंडेच्या प्रचारात

माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक

बीड : प्रतिनिधी
सध्या बीडमध्ये एका बंडखोराचा प्रचार सध्या चर्चेत आहे. भाजप आमदार पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा फोटो लावून बंडखोराने प्रचार सुरू केला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील भाजप बंडखोर उमेदवार फुलचंद मुंडे यांनी या महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरले आहेत. बंडखोराच्या प्रचारात मुंडे भावा-बहिणीचे फोटो झळकल्याने जिल्ह्यात सध्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक जागांवर थेट लढत होणार आहे. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काही जागांवर बंडखोरी झाली आहे.

निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

माजलगावमध्येही महायुतीत बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात प्रकाश सोळंके हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीमधील मातब्बर नेते आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये माजलगाव मतदारसंघ पंकजा मुंडे यांना ९०० मतांनी आघाडी देणारा ठरला होता. मात्र याच मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले फुलचंद मुंडे निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरले आहेत.

पंकजांच्या पराभवाचा वचपा काढणार…
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे बंडखोर अपक्ष उमेदवार फुलचंद मुंडे यांनी सांगितले. या निवडणुकीत पंकजा मुंडे देखील मला सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती आहे त्यामुळे विजय माझाच होणार तसेच लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा वचपा काढला जाईल, असेही त्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR