24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रधसविरोधात मुंडे समर्थक आक्रमक

धसविरोधात मुंडे समर्थक आक्रमक

काळे झेंडे दाखवले, तणावपूर्ण परिस्थिती

बीड : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांच्या वाहनांचा ताफा परळी तालुक्यात अडवण्यात आला. काही तरुणांनी धस यांच्या वाहनांचा ताफा अडवत धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

भाजप आमदार सुरेश धस आज परळीच्या दौ-यावर होते. त्यावेळी शिरसाळ्यात त्यांचा ताफा अडवण्यात आला. संतप्त तरुणांनी धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांची कार रोखण्याचा प्रयत्न केला. शिरसाळा चौकात ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी काही तरुणांची धरपकड केली. काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
सुरेश धस यांनी आज संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देशमुख आणि मुंडे यांची हत्या प्रकरणं धसास लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

गोपीनाथगडावर दर्शन घेऊन ते बीडकडे निघाले. त्यावेळी त्यांची कार शिरसाळा चौकात आल्यानंतर काही तरुणांनी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

धस यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणा-या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जवळपास ५ मिनिटं धस यांच्या वाहनांचा ताफा थांबलेला होता. त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘मुंडे साहेब आगे बढो’ अशा घोषणा तरुणांनी दिल्या. यावेळी काही तरुणांची पोलिसांसोबत झटापटदेखील झाली.

केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबरमध्ये अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कराड तुरुंगात आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. धस यांनी देशमुख हत्या प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR