सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. या मोहिमेत चारचाकी दोन हातगाडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुुसार उपायुक्त तैमूर मुलाणी आणि सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर तसेच फूटपाथवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, पथकाकडून जनता दरबारमधील तक्रारी अर्जानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रस्त्यावरील असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. चारचाकी दोन हातगाडी व लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने ही करवाई करण्यात आली. या मोहिमेत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंतकुमार डोंगरे, मुर्तुजा शहापुरे, सुफियान पठाण आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील नागरिक व व्यापा-यांनी रस्त्यावर तसेच फूटपाथवर अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डोंगरे यांनी दिला आहे.