सोलापूर : महापालिकेतील अनेक कामगार पैशांअभावी औषधोपचार घेऊ शकत नाहीत. या कामगारांचा जीव गेल्यानंतरच वरिष्ठ अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल मनपा कामगार कृती समितीच्या नेत्यांनी सोमवारी विचारला. कृती समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मनपातील सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना औषधोपचारासाठी कॅशलेस मेडिक्लेम सुविधा पूर्ववत सुरू करावी, यासह विविध मागण्यांसाठी कृती समितीने कौन्सिल हॉलच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकारने एप्रिल १९९५ नंतरच्या बदली, रोजंदारी कामगार व वाहनचालक यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त प्रस्ताव मागविला आहे. प्रशासनाने अजूनही हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे न पाठविण्याचे कारण काय, असा सवालही कामगार नेत्यांनी केला. घंटागाडी व जलशुध्दीकरण केंद्राकडील कंत्राट पध्दत बंद करावी. लाड कमिटीत पात्र वारसदारांना तत्काळ नियुक्तीपत्रे द्यावी, या मागण्यांचे निवेदन उपायुक्त आशिष लोकरे यांना दिले.
कामगार नेते अशोक जानराव आणि सरचिटणीस प्रदीप जोशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. जानराव म्हणाले, कर्मचारी आणि कामगारांसाठी कॅशलेस पद्धतीचे औषधोपचार करणे ही बाब अत्यंत गरजेची आहे. राज्य शासनाने ५ लाखापर्यंत मोफत औषधोपचार करण्याचे जाहीर केले आहेत; परंतु कामगारांना मोफत औषधोपचार मिळत नाहीत. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. उपचारासाठी स्वतःचा खर्च करण्याची कामगारांची ऐपत नसते. केवळ पैशाअभावी उपचार मिळत नाही, कामगारांना जीव गमावण्याची वेळ येते. यावेळी शेषराव शिरसट, बाबासाहेब क्षीरसागर, अजय क्षीरसागर, दत्ता तुळसे, उमेश गायकवाड, वंदना वाघमारे, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.