बीड : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी होणार नसून ठिय्या आंदोलन करून संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील तीन आरोपींचा मर्डर करण्यात आल्याचा फोन आपल्याला आल्याचा दावाही अंजली दमानियांनी केला आहे.
बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी, सध्या तिथे राजकीय ड्रामा सुरू झालेला आहे. संदीप क्षीरसागर, सुरेश धस हे दुसरे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच आहेत. ते आपापल्या क्षेत्रात तेच काम करतात. अशा लोकांनी बोलावे हे हास्यास्पद आहे. आम्ही हातभर चांगली माणसे जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारत नाही आणि वाल्मिक कराडला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत,असे सांगितले.
फरार आरोपींचा खून?
पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील तिन्ही फरार आरोपींचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक दावा केला आहे. काल रात्री जवळपास साडेअकराच्या आसपास मला फोन आले आणि त्यात असे सांगण्यात आले की, ते तीन आरोपी आता तुम्हाला कधीच मिळणार नाहीत कारण त्यांचा मर्डर झाला आहे. हे ऐकून इतके हादरायला झाले की मी ताबडतोब पोलिस निरक्षकांना फोन करून याची माहिती दिली. ते मेसेज त्यांना सांगितले. त्याची चौकशी ते करतील. हे किती खरं, किती खोटं मला ठाऊक नाही. पण असे झाले असेल तर हे अतिशय भयानक आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
कोण काय कोणाला मारतंय काय चाललंय काहीच कळत नाही. मी पोलिस निरीक्षकांना फोनविषयीही माहिती दिली. त्यांना मी विचारले तर ते म्हणाले, यावर कन्फर्मेशन आलेले नाही. मात्र असे काही झाले नसल्याचे त्यांनी म्हटले नाही. म्हणून काहीच कळत नाही, असेही दमानियांनी म्हटले.