धाराशिव : प्रतिनिधी
चहाची टपरी चालविणा-या पती-पत्नीमध्ये चारित्र्याचा संशयावरून भांडणे झाली. यातच पतीने पत्नीचा लोखंडी कात्री, चाकूने वार करून खून केला. तसेच पत्नी मयत झाल्याचे पाहून पतीनेही स्वत:वर वार करून घेतले. यामध्ये पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील पळदुर्ग येथे घडली.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे वाहिद बिलाल कुरेशी व सुलताना वाहिद कुरेशी(३५) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. या दाम्पत्याचे नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यासमोर चहाचे दुकान असून यावर ते आपल्या कुटूंबियांची उपजिवीका भागवितात. मात्र, वाहिद कुरेशी हे वारंवार आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने या दाम्पत्यामध्ये नेहमीच भांडणे होत असत. अशाच ५ नोव्हेंबर रोजीही या दाम्पत्यामध्ये भांडणे झाली.
ही भांडणे इतकी विकोपाला गेली की, वाहिद कुरेशी याने रागाच्या भरात आपल्या पत्नीवर लोखंडी कात्र, चाकूने पोटावर व पाठिवर वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या सुलताना कुरेशी यांचा अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून वाहिद कुरेशी याने स्वत:च्या गळ्यावर, पोटावर वार करून जखमी करून घेतले. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती कळविली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या वाहिद कुरेशी यास उपचारासाठी दाखल केले. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी खलिल हुसेन शेख(३२, रा. अणदूर ता. तुळजापूर, ह. मु. घरकुल नळदुर्ग) यांनी ५ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाहिद बिलाल कुरेशी याच्या विरूद्ध पोलिसांनी भादंवि कलम १०३ (१), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात जखमी वाहिद कुरेशी याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.