20.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरमुख्यमंत्री पदासाठी मविआत नुरा कुस्ती

मुख्यमंत्री पदासाठी मविआत नुरा कुस्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

प्रतिनिधी : सोलापूर
मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत नुरा कुस्ती आणि खेचाखेची सुरू आहे. एक पार्टी दिवसभर आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगत असते, तर दुसरी पार्टी आणि काँग्रेसवाले ते दिवसभर नाकारत असतात. निवडणुकीअगोदरच महाविकास आघाडीवाल्यांची ही परिस्थिती आहे, त्यामुळे महाविकास आघाडीवाले महाराष्ट्राला कदापि स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सोलापूर शहरात सभा झाली. त्या सभेत बोलताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशात साठ वर्षे राज्य केले. पण, त्यांची विचारसरणी ही समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकवून ठेवणे, हीच काँग्रेसचे धोरण राहिलेले आहे.

महाराष्ट्राला आगामी पाच वर्षांसाठी स्थिर सरकारची गरज आहे, तर दूरगामी धोरण आखली जातील. महाविकास आघाडीवाले ज्या गाडीतून पुढे जात आहेत, त्या गाडीला ना चाके आहेत ना ब्रेक आहे. ती गाडी कोण चालवणार, यावरून त्यांच्यात मारामारी सुरू आहे. महाविकास आघाडीची गाडी सर्वांत अस्थिर गाडी आहे. हे लोक आपापसांत भांडणातच सर्वाधिक वेळ घालवत आहेत, असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काही प्रकल्प कित्येक दशकांपासून लटकले होते, ते महायुती सरकारने पूर्ण केले आहेत.

विकसित महाराष्ट्रामुळे आम्ही विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत. महायुती आहे म्हणून गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाने पाण्यासाठी सर्वाधिक काळ त्रासवले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा जलस्तर उंचावला आहे. आमच्या सरकारने वीजबिल माफ केले आहे. शेतक-यांना बिल भरायला लागू नये, यासाठी शेतक-यांना सोलर यंत्रणा देण्याची योजना आम्ही सुरू केली आहे, त्यातून शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.

सोलापूरकरांच्या प्रेमाचा मोदींना गहिवर
भारतात आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले आहेत, ते सर्व पंतप्रधान जेवढ्या वेळा सोलापूरला आले असतील, त्या पेक्षा जास्त वेळा मी एकटा सोलापूरला आलो आहे. सोलापूरने मला एवढे प्रेम दिले आहे, मी सोलापूरला आलो नाही तर बेचैन होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर आणि आपल्या नात्याबाबत भाष्य केले.

मोदी बोलायला लागले अन् मध्येच महिला माघारी फिरल्या
सभेला प्रारंभी नागरिकांची मोठी गर्दी होती. मोदींना यायला काहीसा उशीर झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांची भाषणे आक्रमक करत गर्दी थोपवून धरली होती. मात्र नंतर जेव्हा मोदिंनी बोलायला सुरुवात केली आणि महिलांसह अनेक नागरिक सभा सोडून निघून जाताना दिसून आले. परिणामी सभेतील मोठ्या भागातील खुर्च्या रिकाम्या दिसून येत होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR