परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या निर्देशानुसार सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम मौजे आरळ ता.वसमत येथे दि.१० रोजी राबविला. यासाठी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांचा चमू तयार करण्यात आला होता.
या चमूमध्ये डॉ. शंकर पुरी यांनी चमू प्रमुख म्हणून तर डॉ. कल्पना लहाडे आणि प्रा. प्रियंका स्वामी यांनी सदस्य म्हणून कार्य केले. उपस्थित शेतकरी बांधवांना उपक्रमाची पार्श्वभूमी चमू प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी सांगून विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली तसेच दुष्काळी व अतिवृष्टीमुळे होणा-या शेतीतील नुकसानीस सामोरे जाण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या. डॉ. कल्पना लहाडे यांनी आहारातील भरड धान्याचे महत्त्व याबरोबरच हंगामानुसार उपलब्ध भाजीपाला आणि फळ पिके यांचा उत्तम स्वास्थ्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात समावेश वाढवण्याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रा. प्रियंका स्वामी यांनी किशोरवयीन मुला-मुलींचे संगोपनाचे महत्त्वाचे टप्पे विशद करत बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून बालविवाह रोखण्याचे आवाहन केले. नागोराव कातोरे यांच्या पितांबरी या सुधारित जातीच्या हळदीच्या प्रक्षेत्रास तसेच रबी हंगामातील सोयाबीन प्रक्षेत्रास भेट दिली. याबरोबरच आरळ येथे कार्यरत असलेला अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट या प्रक्रिया उद्योगास भेट देवून बचत गटाच्या सदस्यांची भेट घेतली. या उपक्रमामध्ये शास्त्रज्ञांनी बळीराजा सोबत एक दिवस घालवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या उपक्रमास उपस्थित शेतकरी बंधू-भगिनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.