मुंबई : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. संविधान दिनाच्या दिवशी भाजपने सकाळी सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
नगर जिल्ह्यात घडलेली ही घटना अत्यंत निषेधार्ह व गंभीर आहेच परंतु महाराष्ट्रात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. नगरमध्ये झालेली ही काही पहिलीच घटना नाही. नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणा-या काँग्रेसच्या दोघांना याआधी रात्री अटक करून कस्टडीत टाकण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीतून या दोघांना भाजपचा माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे घेऊन गेले, त्यांना दमदाटी करण्यात आली, हा सर्व प्रकार चित्रपटात दाखवतात तसा आहे असे सपकाळ म्हणाले.
भाजपला ठोकशाही हवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखा आहे, त्यांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसे सारखी थंड डोक्यानी हत्या करणारी आहे आणि फडणवीसांना दरिंदा म्हटले, त्याच्या त्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना मिरच्या झोंबल्या. पण आम्ही जे बोललो ते योग्यच होते ही अहिल्यानगरच्या घटनेने ते पुन्हा एकदा दाखवूनही दिले आहे. भाजपला लोकशाही व संविधान मान्य नसून ठोकशाही सुरु केली आहे अशी टीका सपकाळ यांनी केली.

