नगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या अस्सल शुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आगामी वाटचाल शत-प्रतिशत विजयी असणार आहे. नगर दक्षिणेत निलेश लंके हा विजयी उमेदवार दिला आहे. त्यामुळे आयात केलेल्या उमेदवाराची गरज नाही. शरदचंद्र पवार पक्षात येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असून, ती आगामी काळात दिसेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.
निलेश लंके यांचा जनसंवाद दौरा नगर दक्षिणेत पाथर्डीतील श्रीक्षेत्र मोहटा देवी येथून सुरू झाला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील यांनी खासदार विखेंविरोधात केलेल्या सूचक विधानांची यावेळी चर्चा होती. शेतकरी अडचणीत आहे. बेरोजगारी वाढली. शेतीसाठी पाणी नाही. अशा अनेक समस्या नगर दक्षिणेत आहेत. या समस्यांवर उत्तम तोडगा काढण्यासाठी निलेश लंकेंना उमेदवारी दिली आहे. शून्यातून विश्वनिर्मिती करू इच्छिणारा.
त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे आणि त्यांच्या सेवेत दुजाभाव नसतो, असेही जयंत पाटील म्हणाले. येत्या १६ दिवसांत ते मतदारसंघातील किमान ५० टक्के गावांतून जातील. नवे व स्वच्छ आणि तळागाळात काम करणारे नेतृत्व असल्याने गावा-गावांतून गेल्यावर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत नक्कीच होईल, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला