गौतम वाठोरे: हदगाव
हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होताना दिसत आहे. या मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होण्याच्या मार्गावर आहे.
दोन दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात वाढलेली आहे. या उन्हाच्या कडाक्यामध्ये सुद्धा कुठेही विसावा न घेता तहान-भूक विसरून तिन्ही उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत व आपापला प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण हे तीनही प्रमुख उमेदवार फक्त तीन ते चार तास झोप घेत असल्याची माहिती मिळाली आहे. बाबुराव पाटील कोहळीकर हे सकाळी सात वाजता घरातून चहा घेऊन प्रचाराची सुरुवात करतात. मोठ्या नेत्यांच्या नियोजनाची तयारी, कार्यकर्त्यांच्या बैठका, बूथ प्रमुखांच्या बैठका, प्रमुख पक्षासोबत बैठका, प्रत्येक खेड्यापाड्यात, वस्ती-तांड्यात पायी प्रचार करून यामध्ये संपूर्ण दिवस निघून जात आहे सायंकाळी भेटेल तिथे जेवण करून रात्री एक ते दोन वाजेपर्यंत काम करीत आहेत. ज्या भागात प्रचार दौरा आहे त्याच भागाकडे रात्री दोन वाजता मुक्काम करीत झोपण्याची व्यवस्था केली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा दिनक्रम सकाळी सात वाजता सुरू होतो.
तेव्हापासून ते पायाला भिंगरी लावून आपला मतदारसंघ ंिपजून काढत आहेत. वेळ मिळाला तिथे नाश्ता, सकाळचे जेवण दुपारी कार्यकर्त्यांसोबत करीत आहेत. दिवसभर शहरी भागासह ग्रामीण भागात पायी चालत प्रचार. सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका, मित्र पक्षांच्या बैठका, कॉर्नर बैठका यामध्ये संपूर्ण दिवस जात आहे. रात्री मिळेल तिथे जेवण करून एक-दोन वाजेपर्यंत ते काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी. डी. चव्हाण हे पेशाने डॉक्टर आहेत तरी पण त्यांचा दिनक्रम पूर्ण बदलून गेला आहे. ते चहा जास्त प्रमाणात घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांसोबत नाश्ता व भेटेल तिथे जेवण करत आहेत. मतदारसंघात बंजारा समाज जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या पाहुणे मंडळीकडेच रात्रीचे जेवण होत आहे. ज्या मतदारसंघामध्ये प्रचार दौरा आहे तिकडेच मुक्कामाला राहून रात्री एक ते दोन वाजेपर्यंत काम करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे त्यांची भूक-तहान हरली आहे अशी माहिती मिळाली आहे. एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला वेग आला असून प्रचार हा सुसाट झाला आहे.