नागपूर : नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधताना फहीम खानने काही भागात अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली होती. मात्र, नागपूर पालिकेच्या कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, तत्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच, अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन महापालिकेकडून होत असल्याचा दावा हायकोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला होता.
उपराजधानी नागपूर येथील दोन गटात झालेल्या दंगलीची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींकडूनच नुकसानीचा खर्च वसुल केला जाईल, असे म्हटले होते. तसेच, या दंगलीतील कथित मास्टर माईंड फहीम खान यांच्या घरावरही महापालिकेकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडसाईनचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. त्यानुसार, उच्च न्यायालयाने जेसीबीने सुरू असलेल्या पाडकामाला स्थगिती दिली असून एक आठवड्यात महापालिकेला आपली बाजू मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, फहीम खानसह कुटुंबीयांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येते.
नागपूर हिंसाचार प्रकरणात राज्य सरकारने बेधडक कारवाई सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणजे नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून अॅक्शन मोडवर येत फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपींच्या घरावर कारवाई केली गेली. तर, शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सील करण्यात आली आहेत. संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथील घरावरही पालिकेचा हातोडा पडला आहे.
युसूफ शेखच्या घरात खाली पार्किंगमध्ये एक रुम अनधिकृत आहे. सोबतच अधिकृत नकाशा व्यतिरिक्त पहिल्या व दुस-या माळ्यावरील बाल्कनीचे बांधकाम करण्यात आले होते, ते नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने तोडले आहे. दरम्यान, गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या तक्रारीमध्ये युसूफ शेखचे नाव हे ४८ नंबर आहे, तर फहीम खान मुख्य आरोपी पैकी एक आहे. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे.
फहीम खानचा जामीनासाठी अर्ज
फहीम खानने जामिनासाठी नागपूरच्या सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. फहीम खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला आजच सुरुवात होणार आहे. नागपूरच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने फहीम खानला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.