बीड : प्रतिनिधी
बीड हत्या प्रकरणावरून महायुतीत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाचे सुरेश धस सातत्याने हे प्रकरण लावून धरत असून, अनेक दावे, आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यासह विरोधकही महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेना संघटना बांधण्याचे काम मराठवाड्यात करत होतो. सर्व जिल्ह्यातील जवळपास साडेसहाशे गावांत माझा संचार झाला.
तिथे असलेले जनजीवन जवळून पाहिले. १९९५ मध्ये भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांची काम करण्याची पद्धत आणि वैचारिक बैठक मजबूत होती. ते गृहमंत्री होते, मनात आणले असते, तर दहा वाल्मिक कराड उभे करू शकले असते. मात्र, तशी त्यांची विचारधारा नव्हती. परंतु, आता मोठा वैचारिक बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. गुंड पोसून राजकारणात मोठे होता येते, पण ते फार काळ टिकत नाही, अशी टीकाही गजानन कीर्तिकर यांनी केली.
गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगणा-या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची कार्यपद्धती शोभणारी नाही. त्या भागातील जनतेचा विश्वास या दोन्ही बहीण-भावावरून उडालेला आहे. त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. नैतिकता म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा. तरच त्यांना यापुढे राजकीय वाटचाल करताना अडचण येणार नाही. त्या भागात जनता एकसंघ होती, दादागिरीचा लवलेश नव्हता, तो मराठवाडा गेला कुठे, अशी विचारणा गजानन कीर्तिकर यांनी केली.
बीडच्या जनतेचा रोष
पुन्हा एकदा सांगतो, त्या भागात भीतीचे वातावरण आहे, बीडमधील जनतेचा विश्वास उडाला आहे. बीडच्या जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंडे बंधू-भगिनींनी त्यागपत्र द्यावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना हे शोभदायक नाही. गोपीनाथ मुंडे यांनी पेरलेल्या विचाराला या गोष्टी मारक आहेत.