नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहरासह जिल्हात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाला. कंधार लोहा तालुक्यात अवकाळी पावसाने मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झोडपून काढले वादळी वा-यासह विजांचा कडकडाट झाल्याने कंधार तालूक्यात दोन ठिकाणी वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण बदलले होते. दरम्यान जोरदार वा-यासह विजांचा कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाल्याने सर्वांची पायपीट झाली.
या पावसामुळे शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू तसेच हरभरा आणि इतर पिकांचे व झाडाच्या आंबे गळून पडल्यामुळे आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले आहे. घागरदरा येथील शेतकरी विठ्ठल धोंडीबा गडंबे यांच्या शेतामध्ये दोन गाय जनावरे बांधलेले असता त्यांच्या अंगावर विज पडून दगावली तर पानभोसी येथील शेख शादुल युसुबसाब यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली असून दोन्ही शेतक-यांना मदत मिळावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. नांदेड शहरात मंगळवारी रात्री उशीरापर्यत वादळी वा-यासह विजांचा कडकडाट सुरूच होता.