नांदेड : विशेष प्रतिनिधी
श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळ दि. २२ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश विमान प्राधिकरण विभागाकडून देण्यात आले होते. तात्काळ विमानसेवा बंद झाल्यामुळे नांदेडात त्यावेळी उलटसुलट चर्चाही झाली. परंतु नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे कुठलाही अनर्थ घडू शकतो, या अनुषंगाने तात्काळ विमानसेवा बंद करण्यात आली.
ही बाब जिल्हाधिकारी नांदेड यांनी गंभीरतेने घेत कुठलाही गाजावाजा न करता धावपट्टीचे काम पूर्ण केले. त्यांच्या परिश्रमामुळे व सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आजघडीला नांदेड येथील विमानसेवा उद्या दि. १० सप्टेंबरपासून सुरू करण्यात येत आहे.
यासंदर्भात नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्थगिती आदेश मागे घेतला असून श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावरील सर्व विमानसेवा दि. १० सप्टेंबरपासून तात्काळ प्रभावाने पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मान्यता मिळताच विमान कंपन्यांनीदेखील आपली बुकिंग सुरू केली आहे.

