परभणी : नांदेड विभागाने उन्हाळी स्पेशल म्हणून सुरू केलेली नांदेड-हडपसर गाडी पुर्णे मार्गे पनवेल पर्यंत चालवावी ही मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाची मागणी दक्षिण मध्य रेल्वेने मान्य केली आहे. आता ही गाडी दि. २९ मे पासून पुणे मार्गे पनवेल पर्यंत धावणार आहे.
उन्हाळी स्पेशल गाडी म्हणून नांदेड विभागाने हडपसर पर्यंत गाडीची घोषणा केली होती. परंतु मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशासाठी हडपसर हे ठिकाण खूपच गैरसोयीचे होते आणि वेळापत्रकातही खूप लूज टाईम असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. ही गाडी सुरू झाल्यापासूनच मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने या गाडीच्या वेळापत्रकात बदल करणे तसेच सदर रेल्वेला पुणे मार्गे पनवेल पर्यंत चालवावी अशी मागणीचा रेटा लावून धरला होता. या बाबत आज प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने दमरेच्या अधिका-यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या त्यांचा समोर मांडल्या.
या मागणीला मंजुर करताना नांदेड-हडपसर उन्हाळी विशेष रेल्वे पुढील फेरी म्हणजे दि. २९ मे पासून नांदेड-पुणे-पनवेल पर्यंत धावणार असल्याची माहिती वाहतूक प्रबंधक श्रीनाथ यांनी मान्य केले. सदर रेल्वे नांदेड येथून रात्री ९ ला निघून पुणे दुस-या दिवशी सकाळी ९ तर पनवेल येथे दुपारी १२ वाजता दरम्यान तर परतीत पनवेल-नांदेड विशेष रेल्वे पनवेल येथून दुपारी ३ला निघून पुणे सायंकाळी ६ तर नांदेड येथे दुस-या दिवशी सकाळी ७ दरम्यान पोहचणार असल्याचे सांगितले. यावेळी जनशताब्दी एक्सप्रेससाठी परभणी स्थानकावरून सकाळी ६ पर्यंत करंट बुकिंगची व्यवस्था करावी ही मागणी देखील मान्य केली.
यावेळी रेल्वे अधिकारी अतिरिक्त वाणिज्य प्रबंधक श्रीनिवास सूर्यवंशी, अतिरिक्त वाहतूक अधिकारी विवेकानंद देखील उपस्थित होते. नांदेड-औरंगाबाद दैनंदिन रेल्वेला पूर्ववत सुरू करावे, नांदेड-रायचूर रेल्वेला छ.संभाजीनगर येथून तर जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला नांदेड येथून सोडण्याचे मागणी या वेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉ. किरण चिद्रवार, माणिक शिंदे बलसेकर, नारायण अकमार, नंदकुमार दुधेवार आदीचा समावेश होता.