नांदेड : प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांचे महापौरपदासाठीचे आरक्षण आज सकाळी जाहीर करण्यात आले. नांदेड महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले आहे. नांदेड महापालिकेत एकूण २६ महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकी भाजपच्या १२ महिला सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोण होणार महापौर, असे सांगितले जात आहे.
नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले आहे. महापालिकेत २६ महिला निवडून आल्या असल्या तरी खुल्या प्रवर्गातून केवळ १२ महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये ज्योती किशन कल्याणकर, कविता मुळे, शांभवी प्रवीण साले, वैशाली मिलिंद देशमुख, कविता नागनाथ गड्डम, सदिच्छा सोनी, सुदर्शना महेश खोमणे, रुची अल्केश भारतीय, ठाकूर अमृताबाई बजरंगसिंह, कुंजीवाले मनप्रीत कौर, अनुराधा राजू काळे, सुवर्णा सतीश बसवदे यांचा समावेश आहे. त्यामुळे महापौरपदासाठी नांदेडमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. यात महापौरपदावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता नांदेडकरांना लागली आहे. यापूर्वी तीन महिलांनी महापौरपद भूषविले आहे. यात जयश्री पावडे, शैलजा स्वामी आणि शीला भवरे यांचा समावेश आहे.
शांभवी यांचे नाव आघाडीवर?
सनातनी व कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शांभवी साले प्रथमच निवडून आल्या आहेत. प्रदीर्घ अनुभव नसला तरी राजकीय वारसा, उच्च शिक्षण आणि वाणीवर प्रभुत्व असलेल्या या नगरसेविकेचे नाव नांदेडकरांतून घेतल्या जात आहे. नांदेड महापालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यातच कट्टर भाजप समर्थक असलेली शांभवी यांचे नाव नांदेडात नव्हे तर नागपुरातही गाजलेले आहे. नागपूरमधील संघ परिवारात सर्वात प्रथम शांभवी यांचे नाव घेतल्या जाते. त्यामुळे शांभवींचे नाव नांदेडातून जाहीर होणार की नागपूर संघ मुख्यालयातून होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खा. चव्हाणांना भाजप श्रेष्ठींकडे चांगला मॅसेज पाठवायचा असेल तर शांभवी साले यांचे नाव अंतिम होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

