नाशिक : संगमनेर तालुक्यातील निमोन गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटारसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. मृतांमधील दोघे सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील तर एक जण अकोले तालुक्यातील गर्दनी येथील रहिवासी आहे.
नांदुर शिंगोटे-लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास झाला. कंटेनर व पल्सर मोटारसायकल यांच्यात अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली. सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे अपघात स्थळी पोचून त्यांनी सदरचा कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला.
अपघातामध्ये मृत झालेल्यांमध्ये नांदुर शिंगोटे येथील आदिवासी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३०) व युवराज धोंडिबा मेंगाळ (वय २९) व संदीप सोमनाथ अगविले (रा. गर्दनी, ता. अकोले) यांचा समावेश आहे. तिघे मोटारसायकलने जात असताना कंटेनर (क्रमांक जीजे १५ एव्ही ६६५६) व पल्सर मोटारसायकल (क्रमांक एमएच १५ एचके ५३०४) यांचा अपघात झाला. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्यामुळे मोटारसायकलवरील तिघेही गतप्राण झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नांदुर शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेतली. सदरचा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये तिघेही तरुण जागीच ठार झाले. रविवारी (दि. २१) सकाळी नांदूर शिंगोटे येथे दोघांवर व एकावर गर्दनी येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले.