मुंबई : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे इच्छुक होते. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे यांच्या उमेदवारीवर टीका करताना त्यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली त्यावरून टोला लगावला. वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे नाव भाजपच्या तेराव्या यादीत, पहिल्या बेंचवर बसणारे तुम्ही म्हणता मात्र तुम्हाला शेवटच्या बेंचवर उमेदवारी मिळाली. भाजप पक्षात नारायण राणे यांची ही पात्रता आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीचे नाव भाजपच्या तेराव्या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. आपण पहिल्या बेंचवर बसणारे असे राणे स्वत:बद्दल सांगतात आणि त्यांचे नाव आता शेवटच्या बेंचवरच्या उमेदवारांच्या यादीमध्ये आले आहे.
किरण सामंतसारखा नवखा उमेदवार समोर असताना त्यांना आता शेवटच्या बेंचवर बसावे लागले. त्यामुळे राणेंची पात्रता महायुती आणि भाजपमध्ये काय आहे हे यावरून दिसून येते. ज्यांची भाजपा पक्षातच पात्रता नाही तर लोकांमध्ये असण्याची शक्यता कशी व्यक्त करता.
त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे, असेही वैभव नाईक यांनी म्हटले.
नारायण राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांनी आपल्या मुलांच्या राजकीय करिअरसाठी उमेदवारी घेतली आहे. नारायण राणे हे फक्त त्यांच्यासाठी आणि त्यांच्या दोन मुलांसाठीच राजकारण करत आहेत. आमचा संघर्ष दहा वर्षांसाठी यासाठीच होता की राणेंचीच मक्तेदारी का?