27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची मागणी

अकोला : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय लागणार, हे सर्वांना अपेक्षितच होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट केल्यास सत्ताधा-यांचे सर्व षडयंत्र बाहेर येईल. या ऐतिहासिक निकालासाठी राहुल नार्वेकरांना तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशच बनवले पाहिजे, असा उपरोधिक टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लगावला. राहुल नार्वेकरांवर टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ देखील घसरली.

राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांकडून बुधवारी निकाल देण्यात आला. या निकालावर शिवसेना ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर खरमरीत टीका करताना त्यांच्या नार्को चाचणीची मागणी केली.

ते म्हणाले, ‘‘निकाल काय लागणार याची कल्पना अगोदरच सर्वांना आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निकालामुळे कुणालाही धक्का बसला नाही. त्यांची नार्को चाचणी केली तर सर्व षडयंत्र बाहेर पडेल. हे सगळे षडयंत्र सुरुवातीपासून रचले गेले होते.’’ राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवा. देशाचे चांगले-चांगले निकाल नार्वेकर देतील. केंद्र सरकारने कायद्यात बदल करून नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवावे, अशी उपरोधिक मागणी देखील आमदार नितीन देशमुख यांनी केली.

निकाल विरोधात गेला असला तरी पुढची आखणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. निवडणुकीमध्ये ते ४० आमदार कुठेही दिसणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० पैकी एकही आमदार पडला तर मी शेती करेल, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर कायम राहावे, त्यांच्यावर तेच दिवस येतील, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR